Site icon

बुलढाणा जिल्ह्याला नवीन वर्षाची आरोग्य क्षेत्रात मोठी भेट : बुलढाण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंतर्गत रुग्णसेवा सुरू

Picture courtesy Government medical college, Buldhana website

सिव्हिल रुग्णालयाचीच इमारत, मात्र आता वैद्यकीय महाविद्यालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या हातात उपचार व्यवस्था

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांसाठी दिलासादायक आणि आश्वासक बातमी समोर आली आहे. आतापर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालय म्हणून ओळखली जाणारी तीच सिव्हिल हॉस्पिटलची इमारत आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, बुलढाणा यांच्या प्रशासकीय व शैक्षणिक अधिपत्याखाली कार्यरत राहणार आहे. इमारत तीच आहे, रुग्णालय तेच आहे; मात्र उपचार देणारे हात आता वैद्यकीय शिक्षण देत असलेल्या व अनुभवी तज्ज्ञ प्राध्यापकांचे असतील.

दिनांक १ जानेवारी २०२६ पासून जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालयातील सर्व रुग्णसेवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, बुलढाणा अंतर्गतच दिल्या जाणार आहेत. शासनाच्या नियमानुसार या दोन्ही रुग्णालयांचे कार्य, मनुष्यबळ व जबाबदारी वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आतापर्यंत उपचारासाठी खासगी रुग्णालयात जाण्यास भाग पडणाऱ्या अनेक गरजू रुग्णांना आता शासकीय रुग्णालयातच तज्ज्ञ वैद्यकीय सेवा मिळणार आहे. सामान्य आजारांपासून ते गुंतागुंतीच्या तपासण्या व शस्त्रक्रियांपर्यंतची सुविधा टप्प्याटप्प्याने याच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

बुलढाणा शहरात सुरू झालेल्या या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे जिल्ह्याच्या आरोग्यसेवेत आमूलाग्र बदल घडू लागला आहे. शैक्षणिक वर्ष २०२४–२५ पासून एम बी बी एस अभ्यासक्रमासाठी सुमारे १०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, शिक्षणासोबतच रुग्णसेवा देण्याची जबाबदारी आता या विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या मार्गदर्शक प्राध्यापकांवर आहे. सध्या सुमारे ४३० खाटांचे रुग्णालय कार्यरत असून, भविष्यात ही क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, ही रुग्णसेवा कोणत्याही नवीन इमारतीत नव्हे, तर पूर्वीच्या जिल्हा सिव्हिल व सामान्य रुग्णालयाच्या त्याच इमारतीत सुरू आहे. मात्र आता संपूर्ण प्रशासन, वैद्यकीय सेवा, तपासणी व्यवस्था आणि निर्णय प्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, बुलढाणा येथील अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक आणि विविध विभागांच्या प्राध्यापकांच्या नियंत्रणाखाली चालणार आहे. त्यामुळे उपचारांची गुणवत्ता अधिक शास्त्रशुद्ध, नियोजनबद्ध आणि शैक्षणिक दृष्टीकोनातून होणार आहे.

या संयुक्त व्यवस्थेमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालय हे दोन्ही घटक वैद्यकीय महाविद्यालयाचाच भाग म्हणून कार्यरत राहतील. शासन निर्णयानुसार नोंदणी शुल्क व इतर शासकीय शुल्क लागू राहणार असून, याबाबत रुग्णांनी कोणतीही गैरसमजूत करून घेऊ नये, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, बुलढाणा येथील अधिष्ठाता डॉ. कैलास झिने आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. भागवत भुसारी यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण व्यवस्था उभी राहत आहे. विविध विषयांचे अनुभवी प्राध्यापक, निवासी डॉक्टर, इंटर्न डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचारी मिळून रुग्णसेवेला नवी दिशा देत आहेत.ग्रामीण व निमशहरी भागातील रुग्णांसाठी ही व्यवस्था विशेष लाभदायक ठरणार आहे.

“आता बुलढाण्यातच दर्जेदार उपचार मिळणार” अशी भावना अनेक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांमध्ये निर्माण झाली आहे. शिक्षण आणि सेवा यांचा सुंदर संगम या रुग्णालयात प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार आहे.एकूणच, तीच जुनी सिव्हिल हॉस्पिटलची इमारत असली तरी, आता तिच्यात नव्या ज्ञानाची, नव्या जबाबदारीची आणि नव्या आशेची सुरुवात झाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, बुलढाणा अंतर्गत सुरू झालेली ही रुग्णसेवा भविष्यात जिल्ह्याच्या आरोग्य इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, यात शंका नाही.

Exit mobile version